आंबेत पुलाच्या दुरावस्थेबाबतही आ. जयंत पाटील आक्रमक

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुलाच्या दूरुस्तीबाबत शेकापचे नेते आ. जयंत पाटील सभागृहात आक्रमक झाले. त्यांनी या पुलाच्या दुरुस्तीबरोबरच पुलाच्या जवळ सुरु असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत सवाल उपस्थित केला. यावेळी बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की,पुलाच्या दुरुस्तीचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मोफत फेरी बोट उपलब्ध करून दिली आहे. पुलाच्या खाली सुरु असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सावित्री खाडीवर 12 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी 16 कोटी रुपये मंजूर केले आहेत. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल धोकादायक असल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह आंबेत, म्हाप्रळ, मंडणगड, दापोलीकर, नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे फेरी बोटीतूनच ये – जा करावी लागत आहे.
खाडीत वाळू उत्खनन होत आहे. त्यामुळे पुलाला तडे गेल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याबाबत आणि अवैध रेती उत्खननाबाबत शासनाने काय कार्यवाही केली असा सवाल आ. जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना बांधकाममंत्री चव्हाण म्हणाले, पुलाचा खांब जीर्ण झाल्याचे निदर्शनास आल्यावर 16.76 कोटी रुपयांची कामे पूर्ण करून 20 ऑक्टोबर रोजी पुलावरून वाहतूक सुरु केली आहे. काम चालू असताना, स्थानिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विनाशुल्क फेरी बोट सेवा उपलब्ध केली आहे. पुलापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत वाळू उत्खनन न करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केली आहे. या पुलाच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम 90 टक्ेक पूर्ण झाले आहे. या पुलावरून 20 टनापर्यंतच्या वाहतुकीला परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version