भाडेकरूंची नोंद ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात करा

। पनवेल । वार्ताहर ।

तालुक्यातील ग्रामीण भागात भाड्याने राहणार्‍या सर्व नागरिकांची नोंद ग्रामपंचायत तसेच पोलीस स्टेशनकडे नोंदवायला हवी अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी आणि पोलिसांना मनसेच्यावतीने देण्यात आले.

पनवेल तालुक्यात विविध धर्माचे नागरिक पूर्वीपासून एकोप्याने राहत आहेत. परंतु मागील काही वर्षापासून तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत भंगारवाले, मटन, चिकनवाले सलूनवाले इत्यादी दुकानदार व फेरीवाले हे व्यवसायाच्या निमित्त मोठ्या प्रमाणात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. तसेच ते ज्या गावात भाडेकरू म्हणून राहतात, त्यांच्यासोबत त्यांचे कित्येक नातेवाईक, अनधिकृतपणे वास्तव्यास ये-जा करत असतात. कित्येक ग्रामपंचायतीकडे भाडेकरूंची नोंद नसते व ते कुठून आले, काय काम करतात याचा पत्ता नसतो. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई, उरण परिसरात घडलेले कृत्य पाहता आणि भाड्याने वास्तव्यास असलेल्या भाडेकरूकडून कोणताही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पनवेल तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील गावातील महिला भगिनींना तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत राहणार्‍या भाडेकरूंचा भाडेकरार व त्यांच्या मूळ गावाचा पत्ता इत्यादी. सर्व माहिती ठेवण्याचे आदेश शासकीय विभागाकडून देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन पनवेल गटविकास अधिकारी पंचायत समिती, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि यांना दिनेश मांडवकर, पनवेल तालुका सचिव, विश्‍वास पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष, कैलास माळी उप तालुका अध्यक्ष, विद्याधर चोरघे नेरे विभाग अध्यक्ष व रस्ते स्थापना तालुका संघटक यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Exit mobile version