शहरातील जास्तीत महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन
। रायगड | जिल्हा प्रातिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने एकल महिला नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. शहरातील एकल महिलांनी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये एकल महिला असल्याबाबत तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन अलिबाग नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणीसाठी अंतिम मुदत दि . 27 ऑगस्टपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे.
अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी सागर साळुंखे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती. डॉ. साक्षी पाटील आणि उपसभापती ॲड. अश्विनी ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या नोंदणीत सहभाग घेऊन सर्व पात्र महिलांनी सहकार्य करावे . तसेच सर्व एकल महिलांनी अधिक माहितीसाठी अलिबाग नगरपरिषद कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील एकल महिला (विधवा पतीचे निधन झालेल्या महिला, घटस्फोटीत पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झालेल्या महिला, परित्यक्ता पतीकडून सोडचिठ्ठी न देता किंवा बेवारस सोडलेल्या (त्याग केलेल्या) महिला, अविवाहित लग्न न केलेल्या व वयाने मोठ्या असणाऱ्या एकट्या महिला, दिव्यांग किंवा इतर शारीरिक दृष्ट्या अपंग किंवा संकटात एकट्या जीवन जगणाऱ्या महिला) एकल महिलांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात नोंदणी करावी. नोंदणीकरिता अंतिम मुदत दि. 27 ऑगस्टपर्यंत असून, अलिबाग नगरपरिषद हद्दीतील एकल महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने केले आहे.






