पुनर्वसित गावाचा रस्ता पाण्याखाली

निडीतर्फे अष्टमी ग्रामस्थांकडून पाहणी करण्याचे आवाहन
रोहा ( जितेंद्र जोशी )

रोहा तालुक्यातील निडी तर्फे अष्टमी गावाकडे जाणारा रेल्वे अंडर पास रस्ता पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने या गावाकडे जाण्यासाठी असलेल्या पर्यायी रस्त्यावरील रेल्वे फाटक बंद करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने चालवला होता. प्रशासन महसूल विभागाची दिशाभूल करत आहे.पावसाळ्यात या रस्त्याची पाहणी करावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. जेमतेम आठ दिवस झालेल्या पावसाने हा रस्ता पुन्हा पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची मागणी योग्य असल्याचे दिसून येत आहे.

कोकण रेल्वेचे स्वप्न साकार होत असताना कोकणातील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जागा या प्रकल्पाला अल्प मोबदल्यात उपलब्ध करून दिल्या.या प्रकल्पामुळे काहींची घरे विस्थापित करण्यात आली. रोहा तालुक्यातील निडीतर्फे अष्टमी येथील सुमारे 30 कुटुंबाना रेल्वे मार्गाच्या पलिकडे जागा देऊन विस्थापित करण्यात आले आहे. पण रेल्वे विस्थापित गावाला रेल्वे प्रशासनाने आजपर्यंत कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीतच. पण या गावाकडे जाणारा मार्ग बंद करण्यासाठी स्थानिकांवर दबाव आणला होता.

रेल्वे प्रशासनाने सदर रस्त्यावर साठणारे पाणी उपसा करण्यासाठी पंप हाऊस बांधलेले नाही तसेच कायमस्वरूपी पंप बसविण्यात आलेला नाही. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी आवश्यक गटारांची कामे केलेली नाहीत. तरी महसूल विभागाने पाऊस पडत असताना या ठिकाणाची पाहणी करावी अशा आशयाचे पत्र सरपंच व ग्रामसेवक निडीतर्फे अष्टमी यांनी प्रशासनाला दिले आहे.

निडी तर्फे अष्टमी येथील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद केल्यास तीस घरातील नागरिकांचा पावसाळ्यात बाह्य जगाशी संपर्क तुटणार असल्याने आमच्या मागण्यांचा रेल्वे प्रशासन व महसूल प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार तसेच पालकमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून ग्रामस्थांच्या मागण्या योग्य असल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे.

Exit mobile version