| पनवेल | प्रतिनिधी |
26 जानेवारी रोजी देशाचा प्रजासत्ताक दिन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नेहमीप्रमाणे भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ध्वजारोहणानंतर होणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बल, पनवेल महापालिका अग्निशमन दल तसेच महाराष्ट्र सुरक्षारक्षक दलाच्या परेडसाठी शुक्रवारी रंगीत तालीम घेण्यात आली. शिस्तबद्ध पावले, एकसंध संचलन आणि आदेशांचे अचूक पालन यामुळे मैदानावर राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या तालीमीत यावर्षी विशेष टू-व्हिलर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या दलांचे कौशल्य, चपळता आणि समन्वय याचे प्रभावी दर्शन यावेळी घडले. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने ही प्रात्यक्षिके महत्त्वाची ठरली. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. शिस्त, सेवा आणि समर्पण या त्रिसूत्रीचा प्रत्यय देणारी ही रंगीत तालीम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली होती.






