पाली भूतीवली धरणाचे मजबुतीकरण

धरणाच्या भिंतीला दगडी पिचिंग

। नेरळ । प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात रेल्वे पट्ट्यात असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी पाली भूतीवली येथे धरण बांधण्यात आले. 2004 मध्ये या धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाला असून या धरणाच्या मातीच्या बांधाला दगडी बांधकामाने अधिक मजबूतीकरण आणि रस्ताही दगडी पिचिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, या दगडी पिचिंगमुळे धरणाच्या जलाशयात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात कोणतीही नदी असल्याने या भागात सतत पाणीटंचाई असायची. त्यामुळे 1982 साली तत्कालीन आमदार स्व. तुकाराम सुर्वे यांच्या प्रयत्नातून पाली भूतीवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर झाला. मात्र त्यानंतर या धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम 1996 मध्ये सुरु झाले. त्यावेळी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पुढाकार घेऊन खर्‍या अर्थाने कामाला सुरुवात करून घेतली होती. परिसरातील 15 गावांमधील 1000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणू शकणार्‍या या लघुपाटबंधारे धरणामध्ये 2004 मध्ये प्रत्यक्ष पाणीसाठा झाला होता आणि त्यावेळी धरणातील त्या पाण्याचे जलपूजन तत्कलीन आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाला असताना धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडले जावे यासाठी कळावे बांधण्यात आले नव्हते आणि त्यामुळे आजपर्यंत मागील 20 वर्षात दुबार शेती 15 गावातील शेतकर्‍यांना करता आलेली नाही.

पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकर्‍यांची संघर्ष समिती काम करीत होते. त्या संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी सरपंच जवाहर देशमुख हे आज हयात नाहीत. त्यात कालव्यांची कामे गेली 20 वर्षात पुढे सरकली नाहीत आणि त्यामुळे धरणाच्या पाण्यावर बिल्डर लॉबी पोसली जात आहे. त्यात शेती शिवाय तरणोपाय नाही यांची कल्पना सर्व तरुण वर्गाला अली आहे. त्यामुळे शासनाने कालव्यांची कामे पूर्ण करून शेतीसाठी या धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. मागील दोन वर्षे शेतकरी या धरणाच्या अर्धवट असलेल्या कालव्यांच्या कामासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे अर्ज निवेदने घेऊन जात होती.

आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील शासनाकडे कालव्यांची आणि धरणाची इतर कामे पूर्ण करण्यासाठी कोटींचा निधी दिला आहे. सध्या धरणाच्या सांडव्याचं भिंतीचे तसेच मुख्य बांधाचे दगडी पिचिंगचे काम पाटबंधारे विभागाने पूर्ण करण्यावर भर दिला होता. धरणाच्या मुख्य बांधावर पाण्याच्या भागात नव्याने दगडी पिचिंग करण्यात आले आहे. त्याचा परिणाम धरणाची उंची वाढण्यास झाला आहे. दुसरीकडे धरणाच्या सांडव्याचे उंची देखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा नव्याने केलेल्या दगडी पिचिंगमुळे वाढू शकणार आहे. त्याचवेळी धरणाची मुख्य विहीर आणि त्या आजूबाजूचा परिसरदेखील मजबूत करण्यात आला आहे. दुसरीकडे धरणाच्या चिंचवाडी भागात असलेल्या जमिनीतील माती बाहेर काढल्यास धरणाची पाणी साठा क्षमतादेखील वाढू शकतो. त्या भागात पूर्णपणे पाली भूतीवली धरणाची क्षमता दुप्पट होऊ शकते. आमदार किती निधी या धरणाच्या कामासाठी खेचून आणतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version