गंधर्व महोत्सव साजरा
। पेण । वार्ताहर ।
2019 पासून कोरोनाच्या संकटामुळे पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या गंधर्व महोत्सवात खंड पडला होता. परंतु यंदा सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात गेले आठ दिवस तयारी करुन गंधर्व महोत्सव साजरा केला. गंधर्व महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत संजय खापरे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर अभिनेते समीर आनंद, ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने, बापुसाहेब आठवले, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड.मंगेश नेने, मानद सचिव सुधीर जोशी, उपाध्यक्ष संजय कडू, सदस्य समीर साने, डॉ.निता कदम, ज्योती राजे, पुनम शहा, प्रा.सदानंद धारप आदी उपस्थित होते.
यावेळी अभिनेते संजय खापरे यांनी सांगितले की, कलेच्या क्षेत्रामध्ये रंगभुमी अशी आहे की, जे आपण आहोत तेच दिसतो त्यामुळे रंगभुमीची सेवा करुन रंगभुमीशी नाते घट्ट ठेवले पाहिजे. त्यामुळे आपण केलेल्या कामाची दखल सर्वसामान्यांना घ्यावीच लागते. अभिनेते मकरंद अनासपूरे बीडला काम करायचे. प्रसाद पंडीतांन सारखे अभिनेते बेळगावात काम करायचे त्यांची दखल मुंबईत घेतली जायची. त्यामुळे काम कुठेही करा पण काम करताना त्या कामाची दखल घेतली पाहिजे असे काम करा आणि ते काम आपण रंगभूमीवरच करु शकतो. यावेळी बापूसाहेब नेने, अभिनेते समीर आनंन अॅड. मंगेश नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या महोत्सवामध्ये गाण्यांची स्पर्धा, पेनटींग स्पर्धा, डान्स स्पर्धा, मेहन्दी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मोनी अॅक्ट स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर बनवणे स्पर्धा, जाहीरात शो स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, खजिन्यांचा शो स्पर्धा आदी स्पर्धांची रेलचेल होती. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
रंगभुमीशी नाते घट्ट ठेवले पाहिजे- अभिनेते संजय खापरे
