। अलिबाग । वार्ताहर।
कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना 50 हजार रूपयांची रक्कम मिळणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.त्यामुळे रायगडातील कोरोना साथीत दगावलेल्या 4302 मृतांच्या नातेवाईकांना सुमारे 21 कोटींच्या आसपास मदत प्राप्त होणार आहे.
गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काहींनी घरातले सदस्य गमावले तर काहींनी संपूर्ण कुटुंब. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनने एकीकडे सतत भासत असणारी आर्थिक कणकण आणि दुसरीकडे कोरोनाने घरातील सदस्य गमावल्याचे दु:ख. या दोनही गोष्टींचा समतोल साधताना लोकांची अवस्था बिकट झालेली दिसून येत आहे. परंतु केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीमुळे नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.
देशात आत्तापर्यंत 3.98 लाख लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. रायगड जिल्हयातील आत्तापर्यंताच्या कोरोना मृतांची एकूण संख्या ही 4302 इतकी असून त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेत 1329, पनवेल ग्रामीण उरण येथे 308, खालापूरमध्ये 313, कर्जत येथील 179, पेण मधील 295, अलिबाग तालुक्यातील 310, मुरूड मधील 581, माणगाव येथील 107, तळा मध्ये 125, रोहा येथे 29, सुधागड मधील 258, श्रीवर्धन येथील 79, म्हसळा मध्ये 97, महाड येथे 54, पोलादपूर मधील 52 अशी तालुक्यांप्रमाणे कोरोना मृतांची एकूण आकडेवारी आहेे.
त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना जर 50 हजार रूपयांची रक्कम मिळणार असेल तर रायगडातील कोरोना मृतांची संख्या ही 4302 असून त्यांना 21 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच आधी झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई देणार असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले आहे.