कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी ऑनलाइन नोंदणी करावी

डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपयांची राज्य सरकारतर्फे मदत करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या व्यक्तींचे कोरोनाने निधन झाले आहे, अशा व्यक्तींच्या निकट नातेवाईकांनी सरकारच्या निर्देशानुसार mahacovid19relief.in ऑनलाईन वेब पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई निश्‍चित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. ही भरपाई राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, ही मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
तक्रार निवारणासाठी संबंधित जिल्हाधिकारी तसेच महापालिका क्षेत्रात उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव हे जिल्हा शल्य चिकित्सक अथवा महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी असून, तक्रार निवारणासाठी सचिव यांच्या कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

पोर्टलवर अर्ज करावा
कोरोना मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. हे सहाय्य मिळण्यासाठी कोरोना आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने याकरिता विकसित केलेल्या mahacovid19relief.in वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच अर्जदार स्वत: अथवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकणार आहे.

Exit mobile version