बालमजुरांची जाचातून सुटका; चार मालकांवर गुन्हा दाखल

। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आस्थापनांवर छापा टाकून तीन बालकामगारांना कामाच्या जोखडातून मुक्त केले. तर, बालकामगार कामावर ठेवल्याप्रकरणी दोन आस्थापनांमधील प्रत्येकी दोन अशा एकूण चार मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
यात श्री देवदर्शन डेअरी, शॉप नं 31, हावरे बिल्डीग, से 09, खांदा कॉलनी, खांदेश्‍वर याठिकाणी एक बालकामगार तसेच सदर डेअरीच्या बाजुस असणार्‍या श्री चॉमुंडा ओल्ड पेपर मार्ट, शॉप नं 32, हावरे बिल्डीग, से 09, खांदा कॉलनी, खांदेश्‍वर याठिकाणी दोन बालकामगार हे काम करीत असताना मिळून आले. या सर्व बालकामगारांची मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी श्री देवदर्शन डेअरीचे मालक शांतीलाल छगनलालजी गुजर (34) व दिलीप छगनलालजी गुजर या दोघांविरोधात तसेच चाँमुण्डा ओल्ड पेपर मार्ट, शॉप आस्थापनेचे मालक वालाराम कालुजी पटेल, (वय 38 वर्ष) व भगवतीलाल मेघाजी पटेल या दोघांविरोधात अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version