येत्या आठ दिवसांत उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. मात्र, रायगड जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारींची कोणतीही दखल घेत नाही, तसेच कोणतीही न्यायिक भूमिका घेण्याऐवजी दडपशाही धोरण राबवित असल्याने स्थानिक शेतकरी, गावकरी व भूमीपुत्रांत प्रचंड असंतोष उफाळून येत आहे. स्थानिक व शेतकर्यांचे कोणतेही प्रश्न न सोडविता संरक्षक भिंत बांधण्यासाठी आलेल्या ठेकेदार व कामगारांना मंगळवारी (दि.28) स्थानिक व शेतकर्यांनी कडाडून विरोध केला. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोणतेही बांधकाम होऊ देणार नाही, असा इशारा बेणसे झोतिरपाडा स्थानिक प्रकल्पबाधित संघर्ष समितीचे पदाधिकारी व पीडित शेतकर्यांनी दिला.
संघर्ष समिती व ग्रामस्थांनी रायगड जिल्हा प्रशासन व मंत्रालय स्थरावर आपल्या तक्रारी व समस्यांबाबत वारंवार अनेक निवेदन दिली आहेत. मात्र, कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने पेण प्रांताधिकारी यांच्या दालनात प्रांताधिकारी, तहसीलदार, एमआयडीसीचे अधिकारी, पोलीस प्रशासन, संघर्ष समितीचे पदाधिकारी, शेतकरी यांच्यासमवेत बैठक पार पडली होती. या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकरी व रोजगार यासंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर एमआयडीसी प्रशासन व कृषी अधिकारी यांनी शेतजमीन व सुरू असलेल्या कामाची पाहणी करून एमआयडीसीच्या अलिबाग कार्यालयात अहवाल सादर केला होता. मात्र, एमआयडीसी कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्याने कोणत्याही परवानग्या दिल्या नसल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांना सांगितले.
रिलायन्स व्यवस्थापनाकडून स्थानिकांच्या कोणत्याही प्रश्नांचा सकारात्मक विचार केला जात नाही, तसेच एमआयडीसी प्रशासनाकडून कोणत्याही परवानग्या प्राप्त नसताना पोलीस बळाचा वापर करून रिलायन्स व्यवस्थापन अतिघाईने काम आटपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे व पदाधिकार्यांनी केला. या कृतीने स्थानिकात प्रचंड संताप व चीड व्यक्त होत आहे. एमआयडीसीने आम्हाला पूर्वापार असलेला जुना मोठा रस्ता द्यावा, तसेच गुरचरण क्षेत्र मोकळे करावे, अशी जोरदार मागणी केली.
रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेणसे सिद्धार्थ नगरलगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेणसे सिद्धार्थ नगर व विभागातील ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. बेणसे सिध्दार्थ नगर गाव व शेतकरी, पशुपालक, मच्छिमार कोळी बांधव यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनीदेखील भेट देऊन 40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा भूमीपुत्र, शेतकर्यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी भीमगर्जना आनंदराज आंबेडकर यांनी बेणसे सिध्दार्थ नगर गावातून केली होती.
यावेळी रिलायन्सच्या नवप्रकल्पाची जागा, बेसुमार केलेली वृक्षतोड, शेतकर्यांचे पूर्वापार वहीवाटीचे मार्ग, संरक्षण भिंत बांधताना रस्त्यासाठी सोडलेली अरुंद जागा, बौद्धवाडीची पाण्याची टाकी,स्मशानभूमीची जागा आदींची आनंदराज आंबेडकरांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली होती. रिलायन्स समूहाने स्थानिक, भूमीपुत्रांवर अन्याय होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये. अन्यथा स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी भविष्यात राज्यव्यापी जन आंदोलन उभे करू असा गर्भित इशारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला दिला होता. आता पुन्हा एकदा आनंदराज आंबेडकर या गावाला भेट देण्यासाठी येणार आहेत. याबरोबरच लेखी तक्रारी निवेदने प्राप्त झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, रिपाइं 1956 चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार येत्या दोन दिवसात बेणसे सिध्दार्थ नगर गावाची भेट घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे व पदाधिकारी यांनी दिली.
रिलायन्सच्या नवीन प्रकल्पासाठी संरक्षण भिंत बांधली जात आहे. बेणसे सिद्धार्थ नगरची स्मशानभूमी हटविणार नाही, तसेच पाण्याची टाकी आमच्या जागेत आहे, ती कुणी बांधली हे पाहावे लागेल. बेणसे सिद्धार्थ नगर गावाला चार मीटरचा रस्ता देण्यात येणार आहे.
रमेश धनावडे,
जनसंपर्क अधिकारी, रिलायन्स नागोठणे