संजय राऊत यांचा दावा
। मुंबई । प्रतिनिधी ।
बीडमधील दहशतवाद विरोधात सुरेश धस यांचे तांडव सुरु आहे, अंजली दमानियांनीदेखील अजित पवारांची भेट घेतली असली तरी या प्रकरणावर काही फैसला होणार नाही. उलट काही दिवसांत वाल्मीक कराड पुन्हा राजकारणात येतील आणि ते भाजपच्या गटात बसलेले दिसतील, असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, अंजली दमानिया यांच्या आधी बीडमध्ये अनेक लोक आंदोलन करत होते, परंतु काही झाले नाही. बीडमधल्या दहशतवादाविरोधात सुरेश धस यांचे तांडव सुरु आहे. हे तांडव शासकीय आशिर्वाद असल्याशिवाय ते होऊच शकत नाही. तरीही यात वाल्मीक कराड हे इस्पितळात आहेत. त्यांच्यासाठी इस्पितळाचा एक मजला रिकामा केलेला आहे. इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, सगळे धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे, असे भाजपचे आमदार सुरेश धस सांगत आहेत. अंजली दमानिया यांचाही भाजपशी संबंध आहे. त्यामुळे आज काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मीक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. सुरेश धस यांचे ऐकले पाहिजे, कारण ते सरकार पक्षातील आमदार आहेत, शिवाय त्या भागातील आहेत. त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे. आम्ही मुंबईतून बोलणे योग्य नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.