दहावी, बारावीच्या परीक्षार्थीवर राहणार वॉच
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 11 फेब्रुवारीपासून बारावीच्या, तर 21 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात याकरिता बोर्डाने कंबर कसली आहे. यंदा 15 दिवस आधीच परीक्षा होणार असल्याने माध्यमिक शिक्षण विभागानेही तयारी सुरू केली आहे.
विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशपूर्व परीक्षांची तयारी करता यावी आणि वेळेत निकाल लागून प्रवेश घेणे सुलभ व्हावे, यासाठी यंदा लवकर परीक्षा होत आहेत. याबरोबरच परीक्षा कॉपीमुक्त आणि कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी भौतिक सुविधांसह सर्व शाळांमध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांची निश्चिती झाली असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले आहे. रायगड माध्यमिक शिक्षण विभागाकडून सन 2024 – 2025 साठी दहावी , बारावी बोर्ड परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यंदा बारावीसाठी जिल्ह्यातील 50 केंद्रावर 31 हजार 978 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावीसाठी 75 केंद्रावर 37 हजार 368 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेसंबंधी कामकाज पाहण्यासाठी जिल्हाभरातील तालुकास्तरावर 16 परिरक्षण कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
कॉपीमुक्तीसाठी सात दिवसांची जनजागृती
कॉपीमुक्तीसाठी रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. यात दि. 20 ते 26 जानेवारीपर्यंतच्या काळात परीक्षासंबंधी माहिती देण्यात येणार आहे. परीक्षा काळात आहार व आरोग्याची काळजी, अभ्यासाची तयारी, मंडळाच्या उत्तर पत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचना व प्रवेश पत्रावरील सूचनांचे वाचन करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याबाबत शपथ दिली जाणार आहे.
दहावी, बारावी परीक्षेपूर्वी रायगड जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कामकाज सुरु असून, यंदाच्या परीक्षा सुरळीत पार पडतील यासाठी नियोजनही करण्यात आले आहे.
महारुद्र नाळे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, रायगड