रिलायन्स गॅस पाईपलाईन: प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली


उपचार न घेण्याचा निर्णय, आंदोलन चिघळणार
| नेरळ | प्रतिनिधी |
रिलायन्स इथेन गँस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणाचा शनिवारी तिसरा दिवस सुरू आहे. केशव तरे आणि उमेश राणे या दोन आंदोलकांची प्रकृती खालावली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेत रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार दिल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या 5 वर्षापासून कर्जत तालुक्यातील निकोप, अवसरे, बिरदोले, कोदिवले, दहिवली, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापुर, गणेगाव, कडाव, मार्केवाडी, सालवड कर्जत येथील रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रतिनिधित्व करणारे केशव तरे यांच्यासह उमेश राणे हे शेतकरी हे 26 आँक्टोबर 2023, रोजी कर्जत तहसिल कार्यालहाबाहेर उपोषणास बसले आहेत.

5 वर्षापासून सनदशीर मार्गाने शेतकऱ्यांचा हा लढा सुरू आहे. माझी प्रकृती जरी खालावली असली, तरी जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही, असे तरे यांनी सांगितले. याला सर्वस्वी रिलायन्स, सक्षम प्राधिकारी आणि प्रशासन जबाबदार असेल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मागण्या
जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे ठरलेला मोबदला मिळावा. दलालांनी जमिनीचे संपादन करण्यासाठी खोटे पंचनामे करून जबरदस्ती जमीन बळकावली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, रिलायन्स प्रशासनाने मंजूर केलेला दर सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावा, कोणत्याही प्रकारचा मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मोबदला द्यावा, ज्यांना अर्धवट मोबदला मिळाला आहे, त्यांना उर्वरित मोबदला त्वरीत देण्यात यावा, जर रिलायन्सला मोबदला देणे मान्य नसेल तर आमच्या 7/12 वरून रिलायन्स प्रकल्पाचा शिक्का त्वरीत हटवावा व आमच्या जमिनीतून कंपनीची पाइपलाईन काढून टाकावी, गेल्या 5 वर्षापासून झालेली पिक नुकसान भरपाई व जमिन दुरूस्ती त्वरीत करण्यात यावी.

Exit mobile version