। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे परिसरातील रिलायन्स (पूर्वीची आय.पी.सी.एल) कंपनीमध्ये उर्वरित स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीत सामवून घ्यावे, या मागणीसाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी बुधवार दिनांक 19 जानेवारी पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसण्याचे ठरविले आहे.
याबाबतचे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात आले आहे. रिलायन्सच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरींग डिव्हिजन या युनिट मध्ये परिसरातील अनेक गावांतील हजारो शेतकर्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यानुसार या कंपनीत येथील काही प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना नोकर्या मिळाल्या. परंतु उर्वरित शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी अजूनही या कंपनीतील कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळेच येत्या काही दिवसात कंपनी व्यवस्थापनाने उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे अन्यथा हे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा किशोरभाई म्हात्रे यांनी या निवेदनामार्फत दिला आहे.