| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित केलेली करवाढ अखेर रद्द केल्याने पालीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर पालीतील नागरिक आणि सुधागड तालुका संघर्ष समितीच्यावतीने नगरपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत करत रविवारी (दि.23) बल्लालेश्वर भक्त निवास क्रमांक 2 येथे एक अभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालीतील विविध वयोगटातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत बोलताना संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ही केवळ करवाढ रद्द होण्याची बाब नाही, तर पालीकरांच्या एकजुटीच्या ताकदीचा विजय आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज महत्त्वाचा आहे आणि तो ऐकला गेला याचा आम्हाला अभिमान आहे. त्यानंतर सभेच्या शेवटी पालीकरांनी एकत्र येत आपला कृतज्ञता भाव व्यक्त केला. भविष्यातही जनहिताच्या मुद्द्यांवर एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.







