सुपारीला प्रतिमण 7520 रुपये सर्वाधिक भाव
। सुधीर नाझरे । मुरुड जंजिरा ।
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव तसेच गेली दोन वर्षे अस्मानी संकटात सापडलेल्या सुपारीला यंदा चांगला भाव मिळाला आहे. बहुउपयोगी सुपारी पिकवणार्या बागायतदारांना यंदा असोली सुपारी प्रतिमण रुपये 7520 इतका सर्वाधिक उच्चांकी दर मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष महेश भगत यांनी जाहीर केला आहे. गेल्या वर्षी याचा दर 6400 रु. इतका होता. यावर्षी वाढीव दर दिल्यामुळे बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
घराघरात धार्मिक कार्यासाठी, कलर टॅनिंग, खायच्या पानांमध्ये आणि मुखवासासाठी वापरली जाणारी सुपारी बहुपयोगी आहे. कोकण किनारपट्टीवरील मुरुड तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना 84 वर्षांपूर्वी सहकार तत्त्वावर करण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे दोन वर्षांपूर्वी सुमारे 150 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने सुपारी फळाचे उत्पन्न 50 टक्क्यांनी घटले होते. मुरुडच्या सुपारीला श्रीवर्धन रोठा, अर्थात एसएमएस या ट्रेडमार्कने संपूर्ण देशभरात मागणी असते. याशिवाय बांगलादेश, पाकिस्तान व मध्य-पूर्व देशात सुपारी निर्यात होते.
खासगी व्यापार्यांकडून शेतकरी वर्गाच्या अज्ञानाचा फायदा उठवून शेतकर्यांना नाडले जाणे, कमी भावात सुपारी खरेदी करणे, वजनात फसवणूक करणे या बाबी टाळण्यासाठी सुपारी बागायतदारांना संघटित करून सुपारी संघाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मुरुडचा सुपारी संघ येथील शेतकर्यांना आधारवड ठरला आहे. आज कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असून, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करत आहे.
सुपारी बागायतीची सद्यःस्थिती
मुरुड तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र 450 हेक्टर असले तरी 399 हेक्टर क्षेत्र हे उत्पादन क्षेत्र आहे. दोन वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळात 142 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. तालुक्यात आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, मुरुड, भोईघर, चिकणी, काकळघर, मांडला, राजपुरी, माझेरी, मजगाव आदी ठिकाणी सुपारी पिकवली जाते.
सुपारी उत्पादनास चांगला बाजारभाव मिळू लागल्याने पुन्हा बागायतदार सुपारी बागांकडे अधिक लक्ष देतील, असा विश्वास आहे.
– महेश भगत, चेअरमन, सुपारी खरेदी विक्री संघ
सुपारी संघातर्फे प्रतिमण (20 किलो) दर
वर्ष प्रतिमण भाव रु.
2019 3900
2020 4120
2021 6400
2022 7520







