उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिलासा

सिटीस्कॅन, डायलिसिस, रक्तपेढी आदी सेवा सुरू

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव येथील बहूचर्चित उपजिल्हा रुग्णालयात विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा आणि सेवा कार्यान्वित झाल्या असून काही प्रमाणात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती पुरेशी झाल्याने रुग्ण, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हे उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांच्या मान्यतेचे असून मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे आहे. या रुग्णालयात दररोज 300 ते 400 रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येत असतात. मात्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात अधिक रक्कम मोजून तपासणी आणि शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागत असत. आता मात्र पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे अशी माहिती सहायक अधीक्षक अविनाश साळवी यांनी दिली.

या रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दाखल झालेल्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळत आहे. तर खासगी रुग्णांना माफक दरात सिटीस्कॅन मशीनने तपासणी करून मिळत आहे. ही यंत्रणा एका कंपनीला देण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे. हे सिटीस्कॅन मशीन सेंटर गेली पाच वर्षे धुळखात पडली होती. सरकारी सिटीस्कॅन मशीन कायमस्वरूपी बंद पडलेली होती. त्यामुळे रुग्णांना या मशीनचा लाभ मिळत नव्हता. आता लाभ होऊन रुग्णांच्या पैशांची बचत होत आहे.आता या रुग्णालयात रुग्णांना अत्यंत आवश्यक असलेल्या डायलिसिस सेंटर सुरू झालेले असून चार खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी पुरेसा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. सध्या किडनी रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version