आरडीसीसी बँकेचा पगारदार खातेदारांना दिलासा

रमझान ईदच्या पार्श्‍वभूमीवर मिळणार बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स रक्कम

। रायगड । खास प्रतिनिधी ।

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने रमझान ईद या सणाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 15 हजारपेक्षा अधिक खातेदारांना बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना बँकेच्या 60 शाखांमधून ही सुविधा (दि.10) एप्रिल पासून उपलब्ध होणार आहे.

प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व पेन्शनर यांना मार्च 2024 चे मासिक वेतन अद्याप प्राप्त झालेले नाही. (दि.11) एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांचा रमझान ईद हा सण साजरा होणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, कोकण विभाग यांच्यावतीने गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी फेस्टीवल अ‍ॅडव्हान्स योजना बँकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. बँकेचे अध्यक्ष, आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांनी सदर संघटनेची विनंती मान्य करून ही सुविधा तात्काळ कार्यान्वित केली जाणार असल्याचे संगितले. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना बँकेच्या 60 शाखांमधून ही सुविधा (दि.10) एप्रिल पासून उपलब्ध असेल. याकरीता महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, कोकण विभाग या संघटनेने बँकेचे आभार मानले आहेत.

बँकेने जिल्ह्यातील आपल्या पगारदार खातेधारकांसाठी अ‍ॅडव्हान्स वेतन, खातेधारकांचा विमा, मोबाईल अ‍ॅप शिवाय फोन पे, गुगल पे यांच्या माध्यमाातून पैसे ट्रान्सफर करण्याच्या अत्याधुनिक सेवा सुरू केल्याने आणि गरजेला मदत करण्याच्या ग्राहक केंद्रीत धोरणामुळे शिक्षक खातेदार वर्ग मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्हा सहकारी बँकेशी जोडला गेला आहे, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले. गतवर्षी देखील दिवाळी सणाच्या वेळी वेतन मिळण्यास शासनाकडून तांत्रिक कारणास्तव दिरंगाई निर्माण झाली होती. अशावेळी देखील बँकेने शिक्षक संघटनेच्या मागणीनूसार शिक्षकांना बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स रक्कम उपलब्ध करून दिली होती. यासह न्यु इंडिया इन्शुरन्सच्या सहकार्याने देखील जीवन विम्याचे फायदे बँकेच्यावतीने या पगारदार खातेधारक यांना देण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळाचे निर्णय तसेच शाखेतील कर्मचारी यांनी दिलेली उत्कृष्ट ग्राहक सेवा यामुळे आज बँकेने मार्च 2024 मध्ये 73 कोटींपेक्षा अधिक नफा कमाविलेला असून व्यवसायाचा टप्पा देखील 5200 कोटींच्या पुढे गेला आहे. यामध्ये ग्राहकांनी अत्तम नफा असून बँकेच्यावतीने सामाजिक बांधिलकी आणि सलोख्याच्या भावनेतून अ‍ॅडव्हान्स वेतन सुविधेचा लाभ बिनव्याजी देण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षक खातेधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी केले आहे.

Exit mobile version