| पनवेल | वार्ताहर |
पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी तत्काळ रुग्णास शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्यामुळे मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडली. याप्रकरणी कुटुंबीयांनी तहसीलदार विजय पाटील यांचे आभार मानले आहेत.
खारघरमध्ये वास्तव्य करणारे दीपक पिल्ले यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने डॉक्टरांनी हृदय शस्त्रक्रिया (एन्जोप्लास्टी) करण्याचा सल्ला दिला होता; परंतु त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला असता सदर रुग्णाकडे नारंगी रेशन कार्ड असेल तर मोफत हृदय शस्त्रक्रिया होऊ शकते, असे सांगण्यात आले. दरम्यान, पिल्ले कुटुंबाकडे शिधापत्रिका नव्हती, मात्र वडिलांच्या पांढर्या शिधापत्रिकेत नाव होते. त्यामुळे योजनेचा लाभ घेता येत नव्हता. ही बाब कार्यकर्ते किरण पाटील यांनी पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, तहसीलदार विजय पाटील यांनी तात्काळ सदर रुग्णाला मदतीच्या भावनेने शिधापत्रिका वेगळी करून दिली. त्यामुळे वाशी येथील एमजीएम रुग्णालयात सदर रुग्णावर मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडली.