हॉस्पिटल ट्रेनने जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा

लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये मोफत उपचार, यशस्वी शस्त्रक्रिया
पाली/बेणसे । वार्ताहर ।

जगातली पहिली हॉस्पिटल ट्रेन लाईफलाईन एक्सप्रेस माणगाव तालुक्यातील गोरेगाव रेल्वे स्थानकावर मागील 15 दिवस उभी होती. यावेळी जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी येथे मोफत उपचार घेतला. तर अनेकांची यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली. इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन, महानगर गॅस, भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. तसेच इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन यांच्या पुढाकाराने येथे 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान ही लाईफ लाईन एक्सप्रेस उभी होती. यासाठी जिल्हा परिषद सीईओ डॉ. किरण पाटील व प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.

यामध्ये डोळ्यांचे परीक्षण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कानाचे विकार असलेले रुग्ण परीक्षण व शस्त्रक्रिया स्त्रीरोग उपचार स्तन व गर्भाशय ग्रीवा कॅन्सर परीक्षण, दातांचे परीक्षण व उपचार, 14 वर्षाखालील मुलांच्या वाकड्या पायांची तपासणी व शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ तसेच भाजलेल्या शरीरावरील परीक्षण व शस्त्रक्रिया अशा विविध आरोग्य सुविधांचा लाभ नागरिकांना मोफत देण्यात आला असे लाईफ लाईन एक्सप्रेस तसेच इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ गुरव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी सांगितले. अगदी मोठ्या शहरात उपलब्ध असलेल्या हॉस्पिटल प्रमाणे अद्ययावत सेवा सुविधा व तज्ञ डॉक्टर या हॉस्पिटल ट्रेनमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत.

अशी आहे ट्रेन
इम्पॅक्ट इंडिया या नावाजलेल्या संस्थेचा हा प्रकल्प 1991 साली सुरु झाला. भारत सरकार व विशेषतः भारतीय रेल्वे विभागाच्या उत्तम सहकार्याने ही आरोग्य ट्रेन देशभर जाऊन काम करत आहे. यामध्ये प्रशिक्षित 25 जणांचा स्टाफ व इतर मदतीसाठी स्थानिक 40 माणसे आहेत. ट्रेनच्या दोन डब्यांत 2 ऑपरेशन थेटर, दातांच्या उपचारासाठी एक डबा आहे. तसेच इतरही सेवासुविधा उपलब्ध आहेत.

उपचारांचा लाभ
या हॉस्पिटल ट्रेनमध्ये पंधरा दिवसांत 4330 रुग्णांनी नोंदणी केली. प्लॅस्टिक शस्त्रक्रिया 320 झाल्या. लहान मुलांच्या हाडांच्या 11 शस्त्रक्रिया झाल्या. लहान मुलांच्या प्लॅस्टिक शस्त्रक्रिया 3 झाल्या. तर कानाच्या 41, मोतीबिंदूच्या 260 आणि इतर 7 शस्त्रक्रिया झाल्या. तसेच 365 जणांच्या दातांवर विविध उपचार करण्यात आले आहेत.

Exit mobile version