प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी केली पाहणी
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील नदीमध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावाला उद्भवणारा संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन नदीतील गाळ काढल्याने मांडला गावाला दिलासा मिळाला असून नुकतीच प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात भविष्यात आपत्ती व्यवस्थापन दृष्टीकोनातून झालेल्या बैठकीत नदीतील गाळ उपसा कामाबाबत समाधान व्यक्त करुन पुढील कामाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या व नदीतील उर्वरित राहिलेला गाळ काढण्यासाठी शासनस्तरावर योग्य ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
अशाच प्रकारे तालुक्यातील उसरोली व आदाड याठिकाणी सरपंच मनीष नांदगावकर व अनवारे यांच्या सहकार्याने नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली. मांडला नदीतील गाळ काढण्याकामी येथील प्रकल्प विकासक तैजून निसार हन्सोजी यांनी सरपंच सुचिता पालवणकर यांच्या विनंतीवरून लागणारी यंत्रसामुग्री नदीपात्र साफ होईपर्यंत विनामोबदला उपलब्ध करून दिली असून भविष्यात यापुढे काम पूर्ण होईपर्यंत योग्य ते सहकार्य देण्याचे वचन हन्सोजी यांच्यावतीने जाहीद कादीरी यांनी दिले आहे.