कधीच नाही झाला अशा ठिकाणी होणार कीर्तनाचा कार्यक्रम

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरीतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्डयांनी डबकी व तलावाचे रूप घेतले आहे. सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. अनेकदा तक्रारी करुनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये किर्तनाचा कार्यक्रम करणार असल्याचा इशारा सत्यशोधक वारकरी महासंघाच्यावतीने हभप महेश पोंगाडे महाराजांनी दिला आहे.

ऐन पावसाळ्यात पाली नगरीला खड्ड्यांचा आजार जडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाली शहरातील अंतर्गत, मुख्य रहदारी व वाहतुकीचे रस्ते यामध्ये भोईआळी, खडक आळी, गांधी चौक, हटाळेश्‍वर चौक, बँक ऑफ इंडिया समोर, ग.बा. वडेर हायस्कूल समोर असे पाली शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

एका बाजूला पाली शहराला वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असताना दुसर्‍या बाजूला येथील जीवघेणे खड्डे डोकेदुखी ठरत आहेत. सद्यस्थितीत पाली शहरातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचून पाण्याचे डबके तयार झाले आहेत. डबक्यात पाणी साचल्यामुळे रोगराई उद्भवणाऱ असल्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. खड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकास खड्डयाचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन जोरात खड्डयात आदळते. त्यामुळे पाणी व चिखल पादचार्‍यांच्या अंगावर उडून वाद देखील उद्भवत आहेत.

रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर व्यवस्थितरीत्या बुजवले नाहीत तर कीर्तनाचा कार्यक्रम येथील खड्यात घेतला जाईल. याची शासन आणि प्रशासन यांनी नोंद घ्यावी.

हभप महेश पोंगडे महाराज, अध्यक्ष, सत्यशोधक वारकरी महासंघ रायगड
Exit mobile version