| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली नगरपंचायतीने शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजवण्याची तातडीची कारवाई केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून नगराध्यक्षा प्रणाली शेळके, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, बांधकाम सभापती सुलतान बेंनसेकर आणि सर्व नगरसेवक-नगरसेविका यांनी तातडीने पुढाकार घेतला.
पाली शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत भागात खड्ड्यांची समस्या निर्माण झाली होती. पावसाळ्यात हे खड्डे अधिक धोकादायक ठरू शकतात, हे लक्षात घेऊन नगरपंचायतीने वेळीच निर्णय घेत रस्त्यांची डागडुजी केली. पालीतील प्रमुख मार्ग आणि रहदारीच्या ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा मिळवून दिली. पाली नगरपंचायतीने वेळीच निर्णय घेत रस्त्यांची सुधारणा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतला, त्यामुळे पावसाळ्यात होणारा त्रास कमी होईल, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
नगरपंचायतीच्या या निर्णयामुळे पावसाळ्यातील संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार आहे. नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.