| कोलाड | प्रतिनिधी |
इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली असून, हा पाऊस संपूर्ण मे महिनाभर कोसळला. यामुळे पूर्वमशागतीची कामे खोळंबली तसेच जून महिना सुरु झाल्यानंतरही कधी ऊन तर काही ठिकाणी जोरदार पाऊस यामुळे 9 जूनची तारीख उजाडली तरी काही ठिकाणी शेतामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे भातपेरणी करण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. या जिल्हातील रोहा तालुक्यातील सर्वात जास्त भातशेती केली जाते. वाढत्या औद्योगिकरणामुळे भातशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. तरीही रोहा तालुक्यात पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. परंतु, ऊन-पावसाच्या खेळात भातपेरणीची कामे खोळंबली आहेत. दरवर्षी शेतकरी 25 मेपासून धुळवाफेची पेरणी करतात. ही पद्धत पारंपरिक आहे. परंतु, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने सुरुवात केली आणि काही केल्या थांबना, यामुळे कोलाड-खांब परिसरातील रब्बी हंगातील उन्हाळी भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर, अवकाळी पावसाने रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील ही पेरणी करता आली नाही. अवकाळी पावसामुळे शेतात भरपूर पाणी साचले आहे. हे पाणी भातपेरणीसाठी उपयुक्त नाही. पेरलेले बियाणे कुजून जाण्याची भीती आहे. यामुळे भातपेरणीची कामे खोलंबली आहेत.