एसटीअभावी प्रवाशांची गैरसोय
| तळा | प्रतिनिधी |
दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी एसटीची वाहतूक वळविण्यात आल्याने बहुतांश एसटी बसेस रद्द झाल्या आहेत. परिणामी, एसटीअभावी तळा बसस्थानकात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 व 9 जून असा दोन वेळा साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख आगारांच्या बस वळविण्यात आल्याने 5 जूनपासून तळा ते इंदापूर अशी शटल सेवा चालणारी रोहा डेपोची बस बंद आहे. तर मालूक, रहाटाड, भांनग, नानवली ही ग्रामीण भागातील माणगाव डेपोची बसदेखील बंद करण्यात आली आहे. यांसह सकाळी 10.30 ची सुटणारी रोहामार्गे पनवेल बसदेखील बंद आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनाने जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.