तलाठी कार्यालय उरणमध्ये स्थलांतरित करा

अन्यथा उपोषणाचा इशारा

| उरण | प्रतिनिधी |

उरण येथील तलाठी कार्यालय सन 2023 पासून जेएनपीटी वसाहतीमध्ये हलविण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करत हे कार्यालय पुन्हा उरण शहरात किंवा लगतच्या परिसरात स्थलांतरित करावे, अशी मागणी माजी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे.

उरणमधील तलाठी कार्यालयाची इमारत नादुरुस्त झाल्यानंतर कार्यालय जेएनपीटी वसाहतीत हलविण्यात आले. मात्र, उरण शहर, केगाव, नागाव, रानवड, बोरीपाखाडी, म्हातावली आणि चाणजे परिसरातील नागरिकांना कार्यालयीन कामासाठी जेएनपीटी वसाहतीपर्यंत जाणे खर्चिक आणि त्रासदायक ठरत आहे. टाऊनशिप गेटपासून सुमारे एक किलोमीटर पायी जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

यासंदर्भात समाजसेवक तथा माजी सरपंच काशिनाथ गायकवाड, नयन म्हात्रे, किसन कोळी आणि राकेश म्हात्रे यांनी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देत कार्यालय तातडीने उरणमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.

माजी सरपंच काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून 2023 पासून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. अनेक वेळा कार्यालयात फेऱ्या मारूनही अधिकारी भेटत नसल्याने नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

उरण तालुका हा शेतीप्रधान भाग असून, येथील जमिनींवर एनएडी, सिडको आणि ओएनजीसीसारखे महत्त्वाचे प्रकल्प कार्यरत आहेत. त्यामुळे महसूल कार्यालये गावांच्या जवळ असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर कृषी कार्यालयही उरणमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जून महिन्यापर्यंत तलाठी आणि कृषी कार्यालय स्थलांतरित न केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंचांच्यावतीने देण्यात आला आहे.

Exit mobile version