विधान परिषद व विधानसभा जिंकण्याचा निर्धार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांपेक्षा एकच भेट द्या… आपला विचार पक्का ठेवा. विचाराशी प्रामाणिक राहा. हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल, असे भावनिक आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. अलिबाग येथील चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना वैचारिक राजकारणाची नाळ जपण्याचे आवाहन केले.
सतरा वर्षांचा असताना पंचायत समितीचा सदस्य म्हणून जनतेने मला संधी दिली. आज मी एकाहत्तराव्या वर्षात प्रवेश केला आहे. या प्रवासात सत्ता आली, गेली; पदे मिळाली, गेली; पण गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी कधीही सोडली नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
पावसामुळे वाढदिवसाचा सोहळा होईल की नाही, अशी शंका होती; मात्र जिल्ह्यातील आणि राज्यभरातील कार्यकर्ते, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रेमामुळे हा सोहळा उत्साहात पार पडल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. लावणीची कामे सुरू असतानाही हजारो कार्यकर्ते प्रेमापोटी येथे आले, यापेक्षा मोठे भाग्य कोणते? असेही ते म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, आयुष्यभर गोरगरीबांच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना संकटकाळात मदत केली. जिल्ह्यात शिक्षण, सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था उभ्या करून रोजगाराची दालने खुली केली. कारण, राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसते, तर समाज घडविण्यासाठी असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीवर विश्वास
दिवंगत डी.वाय. पाटील यांच्याशी घरगुती संबंध असल्याचे सांगताना त्यांनी त्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांच्याशी राजकीय सहवास लाभल्याचे नमूद केले. महाविकास आघाडीतील सर्वात तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. भविष्यातील राजकारणात अशाच विचारवंत नेतृत्वाची गरज आहे. देशाचे आणि महाराष्ट्राचे भले महाविकास आघाडीच करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेसचे राहुल गांधीच पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छाही व्यक्त केली.
पक्षाची विचारधारा गावागावात पोहोचवा
आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी एक खंतही व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्यापासून खासदारापर्यंत अनेकांना राजकारणात मोठे केले. पण, त्यांच्यामध्ये वैचारिक बांधिलकी निर्माण करण्यात आपण कमी पडलो, ही खंत कायम राहील, असे ते म्हणाले. मात्र, ही उणीव आता भरून काढण्याची वेळ आली असून, प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची विचारधारा गावागावात पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभा-विधान परिषदेत आपलाच विजय
आगामी निवडणुकांकडे लक्ष वेधताना जयंत पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी आपल्या विचारांचा विजय झाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आजपासूनच तयारीला लागावे. पक्षाची ताकद बूथ पातळीपर्यंत वाढविणे हीच काळाची गरज आहे. त्यांनी पुढे सांगितले की, बदल घडविण्यासाठी संघर्षाची नवी पद्धत स्वीकारावी लागेल. संघटन अधिक मजबूत करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे हेच पुढील ध्येय असावे.
टक्केवारीच्या राजकारणामुळे विकासाची वाट लागली
सध्याच्या व्यवस्थेवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, आज टक्केवारीचे राजकारण सुरू आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये कमिशनखोरीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. वीस टन क्षमतेच्या रस्त्यावर तीस-चाळीस टन वजनाची वाहने धावत आहेत. मग रस्ते टिकणार कसे? ही परिस्थिती बदलण्याची ताकद तरुणांमध्येच असल्याचे सांगत त्यांनी युवकांना भ्रष्ट व्यवस्थेविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले.
सरकार बदलण्याची तयारी करा
भाषणाच्या शेवटी कार्यकर्त्यांना उद्देशून जयंत पाटील म्हणाले, सत्तेच्या मोहाला बळी पडू नका. विचारांशी तडजोड करू नका. आपली विचारधारा ठाम ठेवा. हीच माझ्या वाढदिवसाची सर्वात मोठी भेट आहे. विचार जिवंत ठेवला, तर संघर्ष जिवंत राहील आणि संघर्ष जिवंत राहिला, तर परिवर्तन अटळ आहे. आता नव्या जोमाने कामाला लागा आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर हे सरकार बदलण्याची तयारी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
अनेकांना मदतीचा हात
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमध्ये सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. अलीकडील अतिवृष्टीत घरांचे नुकसान झालेल्या आठहून अधिक कुटुंबांना ‘ताईची सावली' उपक्रमातून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. तसेच नागाव येथील श्री साई नेत्रालयाला अत्याधुनिक नेत्र तपासणी मशीन भेट देण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा गौरव
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या शेकापच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सदस्य, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या अंजली ठाकूर, अंकीता जैतू, प्रगती शिंगरूत, संतोष मोरे, मंजुश्री राणे, शुभांगी कोंडे आणि नंदू पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
