कळंबोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

13.70 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करून दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात कळंबोली पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालापैकी तब्बल 13 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण तपास पथकाचा नवी मुंबई पोलीस आयुक्त मा. मिलिंद भारंबे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या गुन्ह्यात आरोपींनी भरदिवसा घरफोडी करून सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने, 93 ग्रॅम चांदीचे दागिने व वस्तू तसेच 12 हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला होता. कळंबोली पोलिसांना तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान आरोपी हे उत्तर प्रदेश राज्यातील आंबेडकर नगर जिल्ह्यात आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष तपास पथकाने तेथे जाऊन सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच एक आरोपी शेताच्या दिशेने पळून गेला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीच्या मालापैकी सुमारे 13 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Exit mobile version