गूळाच्या ढेपा सुळक्यावर यशस्वी चढाई
| सुधागड | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील गिर्यारोहक मॅकमोहन यांच्यासह अमित तोरसकर आणि निलेश कवडे यांनी सह्याद्रीतील दुर्गम मानल्या जाणाऱ्या गूळाच्या ढेपा सुळक्यावर नुकतीच यशस्वी गिर्यारोहण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सुधागड किल्ल्याला जोडलेल्या डोंगरसोंडेवर तैलबैला परिसरातून खाली आलेल्या धारेवर वसलेले गूळाच्या ढेपा हे चार सुळके गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी गूळाची ढेप 2 हा सुळका सुमारे 110 फूट उंच असून सोप्या श्रेणीतील मार्गाने हा सुळका सर करण्यात आला. या मोहिमेत सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत तांत्रिक कौशल्य व योग्य नियोजनाच्या जोरावर शिखर गाठण्यात आले. या यशस्वी मोहिमेमुळे सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांचा नावलौकिक वाढला असून परिसरातील युवकांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. गुळाची ढेप 2 व 3 यांमधील खिंडीतून आरोहण मार्गाची सुरुवात होते. सोपे आरोहण करून माथ्यावर पोहोचता येते. मार्गातील प्रस्तराला टेप लावून दोर ओवता येतो. दोर लावण्यासाठी माथ्यावर झाड आहे.
या सुळके समूहापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी जाता येते. त्यात तैलबैला सुळके सर केल्यानंतर गुळाच्या ढेपा सुळक्यांकरिता कोकणात उतरता येते. मुंबई किंवा पुण्यावरून पाली-वैतागवाडी मार्गे धोंडसे गावातून जाता येते. तसेच, सुधागडाच्या पायथ्याला वसलेल्या ठाकूरवाडी हे गावात उतरून गूळाच्या डेपांपर्यंत पोहोचता येते. या गावासाठी पालीहून बस सेवा उपलब्ध आहे.
तैलबैलामार्गे
तैलबैला सुळका सर केल्यानंतर गुळाच्या ढेपा सुळक्यांकरिता कोकणात उतरता येते. तैलबैला पठारावरून सुधागडाकडील कड्यापर्यंत गेले की खाली साध्यकडा व सुधागडाला जोडणाऱ्या धारेवर असलेले चार सुळके दिसतात. या धारेवर उतरणारी वाट कड्यातील ओढ्यातून खाली जाते. धारेवरून गुळाची ढेप-1 या सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते. गुळाची ढेप-2 व 3 हे मुळके सर करण्यासाठी उजवीकडील ओढ्यातून खाली उतरायचे. हाच ओढा पुढे धोंडसे गावाकडे जातो. सुळका 2 व 3 कडून खाली आलेल्या घळीपर्यंत खाली आल्यानंतर त्या घळीतून वर चढत जात गुळाची ढेप-2 व 3 यांमधे पोहोचायचे. तिथून दोन्ही सुळके सर करता येतात. सुळक्यापर्यंत जाण्यासाठी पुन्हा खाली यायचे व सुळका 3 व 4 यांमधून खाली आलेल्या ओढ्यातून वर जायचे. तैलबैला सर करून सवाष्णी घाटमार्गे धोंडसे गावात उतरायचे. त्यानंतर किल्लयावर जाणाऱ्या वाटेने वर येत सुळक्याखाली असलेल्या ओढ्यात पोहोचायचे आणि सुळक्यांचे पायथे गाठायचे.
ठाकूरवाडीमार्गे
ठाकूरवाडी हे सुधागडाच्या पायथ्याला वसलेले गाव आहे. या गावासाठी पालीहून बस सेवा उपलब्ध आहे. ठाकूरवाडीत उतरून गूळाच्या डेपांपर्यंत पोहोचता येते. ठाकूरवाडीत उत्तरल्यानंतर सुधागडाला आपल्या डावीकडे ठेवत नदीच्या काठाकाठाने जाणाऱ्या वाटेने धनगडाच्या दिशेने चालत राहायचे. सुधागडाच्या दुसऱ्या टोकाला आल्यानंतर गूळाच्या ढेपांची वरची टोके दिसू लागतात. या सुळक्यांच्या खाली समांतर आल्यानंतर जंगलातून वाट काढत सुळक्यांच्या पायथ्यापर्यंत जाता येते.







