कराटे बेल्ट परीक्षेत मुलींची उल्लेखनीय कामगिरी

| खरोशी | वार्ताहर |

आजच्या आधुनिक युगात मुलींना फॅशन, ब्युटी, डिझायनिंग यांसोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक बनले आहे. नाशिकमधील मालेगाव, डोंगराळे गावातील लहान मुलीवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलींना सक्षम बनविण्याची गरज अधिक प्रकर्षाने समोर येत आहे. याच अनुषंगाने पाणदिवे येथील पुंडलिक रामा पाटील शाळेत गोशिंन रियु कराटे असोसिएशनतर्फे कराटे बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत उरण तालुक्यातील 5 ते 17 वर्ष वयोगटातील 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांना काता, कुमिते, टेक्निक्स आदी स्वसंरक्षण कलांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान करण्यात आले. यलो बेल्ट प्राप्त करणाऱ्यांमध्ये स्वरा म्हात्रे, विश्रुत गावंड, तोफिक अली, पर्जन्य म्हात्रे आणि प्रार्थना ठाकूर यांचा समावेश आहे. साक्षी पाटील आणि निशा पाटील यांनी ऑरेंज बेल्ट मिळवला. आद्या ठाकूर व सृजा गावंड यांनी ग्रीन बेल्ट तर वेदा नवनीत पाटील हिला पर्पल बेल्ट देण्यात आला. रुद्र मोहन ठाकूर याला ब्राउन-4 बेल्ट प्रदान करण्यात आला.

परीक्षेसाठी असोसिएशनचे इंडिया अध्यक्ष सिहान राजू कोळी, तसेच सेन्साई गोपाळ म्हात्रे, शंपाय भूषण म्हात्रे आणि शंपाय राकेश म्हात्रे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमधील संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुली आणि मुले कराटेमार्फत आत्मविश्वास, शिस्त आणि स्वसंरक्षण या गुणांचे बळकटीकरण करत असल्याने समाजात सुरक्षिततेकडे महत्त्वाचे पाऊल टाकले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. मुलांसोबतच मुलीही आता या क्षेत्रात पदार्पण करत आहेत सुरुवातीलाचं या स्पर्धेत मुलींचा ही तितकाच प्रतिसाद मिळाला याबद्दल मुलींचेही तितकेच कौतुक करण्यात आले.

Exit mobile version