सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची शिष्यवृत्ती
दंतचिकित्सा विभागात शोधकार्यासाठी पीएचडी
। अलिबाग । भारत रांजणकर ।
फार्मसीचे शिक्षण घेत असतानाच पीएचडी करण्याची इच्छा असलेल्या अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील पूजा अजित जैन हिच्या पेपर्समुळे सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने शिष्यवृत्ती बहाल करीत पीएचडी पूर्ण करण्यासाठी द्वार खुले केले आहे. अशा प्रकारे शिष्यवृत्ती मिळवणारी वर्षभरातील पूजा जैन ही एकमेव ठरली आहे. दंतचिकित्सा विभागातील शोधकार्यासाठी ही पीएचडी करणार असल्याचे पूजा जैन हिने कृषीवलजवळ सांगितले.
पूजा जैन हिने आपले मास्टर्सपर्यंतचे शिक्षण फार्मसीमधून केले. पीएचडी करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी तिने कर्करोग विभागाची निवड केली होती. भाभा ऑटोमेटिक रिसर्च सेंटर (बीआरसी) येथे ती काम करत होती. मात्र, शोधकार्यात जास्त इंटरेस्ट असल्याने पुढे जाण्यासाठी तिने पीएचडी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आपल्यात तेवढी क्षमता असल्याची खात्री असल्याने तिने त्यासाठी शोध प्रबंध लिहिण्यास तिने सुरुवात केली. इंटरनॅशनल जर्नलमध्ये तिच्या पेपरला प्रसिद्धीदेखील मिळाली. त्याला खूप नॅशनल युनव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस)पर्यंत पोहोचले. माझे कौशल्य, लिखाण, अभ्यास योग्य वाटल्याने यासाठी असलेल्या प्राध्यापकांनी प्रोत्साहन देत पीएचडीसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी अर्ज केला. त्यासाठी माझी फॅकल्टी ऑफ डेंटेस्ट्री (दंतचिकित्सा विभाग) निवडदेखील झाली. त्यानंतर चार-पाच वर्षांसाठीच्या कोर्ससाठी शिष्यवृत्तीदेखील मिळाली. ही शिष्यवृत्ती मिळणे फार कठीण असते. या विभागात एकाच विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
पूजाचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथील सेंट मेरी आणि महाविद्यालयीन शिक्षण जेएसएम येथे झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण पुण्यातील भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी येथे मास्टर्सचे शिक्षण घेेतले. तिथे रिसर्च ग्रँड कॉम्पिटिशनमध्ये यश मिळवल्याने पूजाला बीआरसीमध्ये प्रवेश मिळाला. यासाठी प्रा.डॉ निलेशकुमार दुबे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे पूजाने सांगितले.
दहावीत असताना एव्हरेज विद्यार्थिनी असलेल्या पूजाला 83 टक्के, तर बारावीत 70 टक्के गुण मिळाले होते. असे असतानाही पूजाने एवढी मोठी झेप घेऊन आपल्या बुद्धिमत्तेची झलक दाखविली आहे. मेडिकलचे दुकान सुरु करण्यासाठी पूजाने फार्मसीला प्रवेश घेतला होता. जी पॅटच्या माध्यमातून एआयसीटीईच्या माध्यमातून मिळालेल्या शिष्यवृत्तीतून पुढे शिक्षण घेत पूजाने प्रत्येक वर्षात चांगले यश संपादन केले. मात्र, सलग चौथ्या वर्षात टॉप केल्यानंतर आपण काहीतरी करु शकतो, हा विश्वास निर्माण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय पूजाने घेतला.
आता पूजा दंतचिकित्सा विभागासाठी शोधकार्य करणार आहे. उदाहरणार्थ दंतचिकित्सेत सिमेंटचा वापर केला जातो, ते शरीराच्या बाहेरील घटकाऐवजी पर्यायी शरीरातील सेल्सच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी शोध घेतला जाणार आहे. यापूर्वी पूजाने आठ महिन्यांहून अधिक काळ कर्करोगाच्या संबंधात शोधकार्य केले होते. मात्र, कोव्हिड काळामुळे ते पूर्ण होऊ शकले नसले तरी त्याचा यासाठी फार उपयोग होत असल्याचे पूजाने सांगितले. बीआरसीमध्ये खूप काही शिकायला मिळाले. यासाठी एक वर्षासाठी सुरुवातीला 1 लाख 22 हजार प्रति महिना त्यानंतर प्रति महिना 1 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत.
