भायमळा येथे शोकसभेचे आयाजन
| वाघ्रण | वार्ताहर |
भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिवंगत लक्ष्मीनारायण रामदास यांची शोकसभा शुक्रवार, दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता अलिबाग तालुक्यातील भायमळा येथील त्यांच्या फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला तालुक्यातून अनेक विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी व चाहते उपस्थित होते.
बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी एल रामदास यांच्या 1953 ते 1993 या काळात त्यांनी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीचा आढावा घेतला. सेझविरोधात स्थापन केलेल्या बावीस गाव बचाव संघटनेचे अध्यक्ष अर्जुन काशिनाथ गावंड यांनी मनोगत व्यक्त करताना सेझविरोधात आंदोलने झाली, त्यामध्ये शेवटपर्यंत सामील झालेले आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढलेले मार्गदर्शक आणि आधार होते, असे मत व्यक्त केले. त्यांच्यानंतर गौतम भिगार्डे (धोकवडे), सेझ आंदोलनातील सल्लागार ॲड. प्रमोद पाटील (वाघ्रण), ॲड. आदिती वैद्य (केतकीचा मळा), रविकीरण पाटील (वाघ्रण), गोपाळ पाटील (मांडवखार), प्रयास हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रवींद्र म्हात्रे आदींनी मनोगत व्यक्त केले.
शेवटी एल रामदास यांच्या पत्नी ललिता रामदास यांनी एल रामदास यांच्या स्वभावाबद्दल सांगताना ते योद्धा होते, शिस्तप्रिय होते, देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते, तेवढेच कुटुंबावरसुद्धा होते हे सांगताना भायमळा येथे आल्यापासून आजपर्यंत ज्यांनी सहकार्य केले, त्यांचा नामोल्लेख करताना एल. रामदास यांनी लहान शालेय मुलांच्या प्रगतीसाठी स्थापन केलेल्या प्रथम ट्रस्टचादेखील उल्लेख केला. यावेळी ललिता यांनी रायगड पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना धन्यवाद दिले.
या शोकसभेला वाय.बी. पाटील, डॉ. रेखा म्हात्रे, पेढांबे ग्रा.पं. सदस्य रुपेश पाटील, वाघ्रणचे पत्रकार दिपक पाटील, प्रकाश पाटील, अमित पाटील, संजय पाटील, प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्या मयूर बेकरीच्या विद्या पाटील यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते.
