चिपळूण हायटेक बसस्थानकाची दूरवस्था

। चिपळूण । वृत्तसंस्था ।
राज्यातील हायटेक बसस्थानक म्हणून चिपळूण बसस्थानकाला ओळख मिळेल, असे जाहीर करीत तत्कालीन मंत्र्यांनी बसस्थानक इमारतीचे भूमिपूजन केले. मात्र, चार वर्षे झाली तरी हायटेक बसस्थानक पाहण्याचा योग काही चिपळूणकरांच्या नशिबी नाही. प्रशासनाची उदासिनता, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी उभे राहणारे हे बसस्थानक सध्या मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांच्यासह सर्प, उंदीर आणि घुशींसारख्या प्राण्यांसाठी निवाराच बनला आहे.
रडतरखडत दोन वेळा सुरू झालेले या बसस्थानकाचे काम पुन्हा दीर्घ कालावधीसाठी ठप्प झाले आहे. पाया सुद्धा पूर्णत्वास गेलेला नाही. संपूर्ण साहित्य गंजले आहे तर परिसरात गवत उगवले असून झाडाझुडपांनी पुरत कवेत घेतले आहे. रत्नागिरी बस स्थानकाच्या कामासाठी दहा कोटींचा बूस्टर डोस देऊन उर्जितावस्था देणार्‍या परिवहन मंत्री परब यांनी चिपळूणच्या बसस्थानकाच्या कामाकडेही नजर टाकावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
5 कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या या बसस्थानकाला तब्बल 23 प्लॅटफॉर्म, आरक्षण, हिरकणी कक्ष, सीसीटीव्ही, वायफाय व्यवस्था, स्वतंत्र पार्किंग, अद्ययावत विद्युत व्यवस्था, याबरोबरच चालक- वाहकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृहे, काँक्रिट पेव्हमेनचा वाहनतळ आदी व्यवस्था करण्यात येणार आहेत. तळमजल्यावर शिवनेरी, शिवशाहीसह होल्वो बसेसच्या सुमारे 500 प्रवासी क्षमतेचे वातानुकूलित वेटिंग रूम, दिव्यांगासाठी शौचालये, 250 प्रवासी क्षमतेचे कँटिनचा समावेश करण्यात आला आहे.

कामात सातत्य नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनबांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. जुन्या बसस्थानकाच्या जागी हायटेक बसस्थानक उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार 23 फेब्रुवारी 2018 ला तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ, स्थानिक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झाले होते. जुन्या बस स्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्यावर सुसज्ज हायटेक बसस्थानक उभारण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले. सुरवातीपासूनच या बसस्थानकाच्या बांधकामाला ग्रहण लागले. निधी नाही, ठेकेदाराचे दुर्लक्ष अशा कारणाने या कामात सातत्य राहिले नाही.

Exit mobile version