सुपेगाव रस्त्यावरील झाडाझुडुपे काढण्यास सुरुवात
| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड-सुपेगाव-रोहा रस्त्यावरील सुपेगाव ते तळेखार फाटा रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून असलेला झाडाझुडपांचा विळखा या कृषीवल वृत्तपत्रातील बातमीची संबंधित बांधकाम खात्याने दखल घेतली आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून झाडेझुडुपे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबद्दल वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुरुड-सुपेगाव-रोहा रस्त्यावर सुपेगाव ते तळेखार फाट्यावर जाताना असलेला झाडाझुडुपांचा विळखा अपघाताला आमंत्रण ठरत असून, तो हटविणार कधी? असा सवाल वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून विचारला जात असून, संबंधित बांधकाम खात्याबाबत नाराजी व्यक्त केली जात असल्याचे वृत्त कृषीवलमधून देण्यात आले होते.
मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपेगाव रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेला झाडाझुडपांचा विळखा आणि अरुंद रस्ता गेल्या तीन वर्षांपासून साईडपट्ट्या झाडाझुडुपांनी भरलेल्या असून, त्या साफ करण्यासाठी मागणी केली जात आहे. अपघातानंतरच संबंधित बांधकाम खात्याला जाग येणार काय, असा सवालही प्रवासी व वाहनचालकांकडून विचारला जात आहे.
फणसाड अभयारण्य व मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रोहा सुपेगावमार्गे मुरुड रस्ता जवळ असल्याने या रस्त्यावर शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यालगत बर्याच ठिकाणी गवत वाढले असून झाडाझुडपांचा विळखा असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित बांधकाम खात्याने दखल घेऊन या रस्त्यावरील झाडाझुडुपांचा विळखा हटविण्यास सुरुवात केली आहे. त्याबद्दल वाहनचालक प्रवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.