क्रीडाभूवनवरील अतिक्रमणे हटवा

जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील क्रीडा भुवन मैदानाची जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शुक्रवारी अचानक पहाणी केली. पहाणीनंतर मैदानावरील अतिक्रमण आणि पार्कीग तातडीने हटवा असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे, तहसिलदार सचिन शेजाळ, उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच याबाबत अनेक क्रीडा प्रेमी, खेळाडू यांनी केलेल्या मागणीनुसार अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देत अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमण होवू नये यासाठी भराव करून संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी उचललेल्या कारवाईबाबत प्रशांत नाईक यांनी समाधान व्यक्त करीत धन्यवाद दिले आहेत.

पाहणी दरम्यान सदर मैदानावर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्कींग करण्यात आल्याचे तसेच मैदानाच्या फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. सदर अतिक्रमण तसेच अनधिकृत पार्किंग बाबत अनेक क्रीडा प्रेमी, खेळाडू यांनी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार 2 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांना पत्र देत माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सदर मैदानावर होत असलेले अतिक्रमण काढून मैदानाला मातीचा भराव करून उंची वाढवण्याची गरज आहे. तसेच मैदानाला लोखंडी बॅरिगेटस् करून मैदानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. माझ्या विनंतीचा विचार करून सदरकामी निधी उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर मैदानावरील अतिक्रमण थांबवावे अशी मागणी केली होती.

क्रीडा भुवन मैदान हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असलेले खेळाचे मैदान आहे. यावर निरनिराळ्या क्रिकेट, फुटबॉल स्पर्धांचे आयोजन होत असते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरु झाली होती. पर्यटकांनी मैदानाचा वापर पार्कींगसाठी सुरु केला होता. फेरीवाल्यांनी मैदानाचे कोपरे ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे खेळाडूंची मात्र कुचंबणा होत आहे. अलिबाग मधील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांच्या सह पत्रकारांनी देखील ही बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. जिल्हाधिकारी यांनी उचललेल्या या कृतीचे स्वागत करीत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबागकरांच्या वतीने धन्यवाद दिले आहेत

Exit mobile version