| उरण | वार्ताहर |
उरण-पनवेल मुख्य रस्त्यावरील फुंडे येथील सिडको कार्यालयाजवळ असलेला पूल धोकादायक स्थितीत आहे. पूल कधीही पडू शकतो म्हणून या मार्गावर फुंडे हायस्कूल, बोकडविरा, कोटगाव येथे बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान) लावून अवजड वाहनांना बंदी आणली गेली आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयावर बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील नागरिक नाराज असून, या बॅरिकेट्स चॅनेल काढले नाही तर ग्रामस्थांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तीन वर्षे लोटले तरीही सदर मोडकळीस आलेल्या पुलाचे काम अजूनही सुरु होत नसल्याने व सिडको प्रशासनाला, सिडकोच्या अधिकार्यांना या समस्याकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याने जनतेतून याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनीही या बॅरिकेट्सविरोधात आवाज उठवत अगोदर सिडकोच्या पुलाची दुरुस्ती करावी व त्यानंतर बॅरिकेट्स त्वरित हटवावेत, अशी मागणी केली आहे. उरण पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको कार्यालय उरण, तहसील कार्यालय उरण यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी पत्रव्यवहार करून ही मागणी केली आहे.
उरणमध्ये रेल्वे स्टेशन होत आहे. तसेच सिडकोने विकसित केलेले द्रोणागिरी नोड या परिसरात बाहेरून नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी येत आहेत. सिडको प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने द्रोणागिरी नोड परिसरातील विकासासाठी व बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावालगत अवजड वाहनांना प्रवेश बंदी म्हणून बॅरिकेट्स चॅनेल लावले आहेत. विशेष म्हणजे द्रोणगिरीतील बिल्डर लॉबीने सिडकोला हाताशी धरून हे बरिकॅट चॅनल टाकलेले आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. मात्र, हे बॅरिकेट्स चॅनेल लावल्याने जड वाहनासोबतच महामंडळच्या बसेस, मोठ्या खासगी बसेस, शासकीय मोठे वाहने, अॅम्ब्युलन्ससह इतर वाहनांना येथून प्रवास करता येत नाही. महत्त्वाची वाहने सदर गावात पोहोचू शकत नाहीत. बोकडविरा, डोंगरी, फुंडे, पाणजे, कोटगाव या गावांना गावात घरे, बिल्डिंग बांधण्यासाठी खडी, माती, रेती, वीट, लोखंडी तारा-सळ्या लागतात. हे साहित्य अवजड वाहनातूनच सदर गावात न्यावी लागते. आता मात्र गावच्या वेशीवर, प्रवेशद्वाराजवळच प्रशासनाने बॅरिकेट्स चॅनेल बसविल्याने जड वाहनांना, मटेरियल नेणार्या वाहनांना गावात जाता येत नाही.
अवजड वाहनासाठी लावलेल्या या बॅरिकेट्स चॅनेलमुळे अनेक अपघात होत आहेत. आजपर्यंत या लोखंडी कमान(बॅरिकेट्स) मुळे नऊहून अधिक अपघात झाले आहेत. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. एखादी मोठी दुर्घटना होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी व शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सदर बॅरिकेट्स चॅनेल 15 दिवसांच्या आत त्वरित हटवावीत अन्यथा शेतकरी कामगार पक्षातर्फे तसेच बोकडवीरा, कोटनाका, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी प्रशासनाला दिला आहे.