शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यावरणपूरक आणि हरित पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेला टोरंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यात शून्य प्रदूषणाचा परिसर आणि निसर्गरम्य वातावरणामुळे दर महिन्याला हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, प्रस्तावित प्रकल्पामुळे कर्जतच्या ग्रीन झोनला धोका निर्माण होणार असून, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. या संदर्भात शिवसेना भवन मुंबई येथील रायगड जिल्हा निरीक्षक वेदिका कांबळे आणि नागपूर संपर्कप्रमुख मंदाकिनी भावे यांनी कर्जत दौरा करून स्थानिक परिस्थिती जाणून घेतली. याबाबतचा वस्तुस्थितीजन्य अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रस्तावित धरण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र पाण्याखाली जाण्याची शक्यता असून, हजारो वृक्षतोड होण्याचा धोका आहे. यामुळे दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होऊ शकतात. तसेच वन्यजीव-मानव संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याचे महिला आघाडीने म्हटले आहे.
या प्रकल्पामुळे शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक नागरिकांचे विस्थापन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घर, शेती आणि उपजीविकेवर परिणाम होणार असल्याने शासनाने पर्यावरणीय बाबींचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कार्य तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, महिला तालुकाप्रमुख करुणा बडेकर, उपसभापती चित्रा ठाकरे, माजी सरपंच प्रमिला बोराडे, उपतालुकाप्रमुख संगीता खडे, पाथरज विभाग प्रमुख मनीषा म्हसे, युवती सेना प्रमुख अर्चना म्हसे, योगिता कांबळे, सारिका मानकामे, नीता मांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.,
