अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
। सुकेळी । वार्ताहर ।
गावोगावी तसेच वाड्यांमध्ये शांतता व सुव्यवस्थेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्या पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून रखडले आहे. अनेकवेळा पोलीस पाटलांचे मानधन हे तीन-तीन महिने होत नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना रायगड जिल्हा पदाधिकारी यांनी आपले प्रलंबित मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
गावागावांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटलांची महत्त्वाची भूमिका आहे. गावातील वाद शक्यतो गावातच कसे मिटवता येतील यामागे पोलीस पाटलांचे महत्त्वाचे योगदान राहते. महसूल व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील प्रत्येक गावोगावी काम पाहतात. असे असताना पोलीस पाटलांचे मानधन हे वेळेवर होत नसल्यामुळे पोलीस पाटलांमधून नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.
मे, जून व जुलै अशा तीन महिन्यांचे मानधन हे अद्यापपर्यंत मिळालेले नसल्यामुळे पुढे येणार्या रक्षाबंधन तसेच कोकणवासियांचा सर्वात महत्त्वाचा असा गणेशोत्सवदेखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा महत्त्वाच्या सणांना पोलीस पाटील यांना मानधन मिळाले नाही तर सण साजरे कसे करायचे, असा प्रश्न पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. त्यामुळे हे मानधन मिळावे यासाठी पोलीस पाटील संघटना रायगड जिल्हा कार्याध्यक्ष राम सावंत, उपाध्यक्ष श्रीधर गोळे, महेश शिरसे, संजय पाटील, संजय बारस्कर आदींनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली.