माथेरान पोलीस ठाण्याचे नुतनीकरण

| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले.नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आ. महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले. माथेरान शहरात येणारे हजारो पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे कार्यरत असून या पोलीस ठाण्याची इमारत ही हेरिटेज प्रॉपर्टी आहे. त्यामुळं नूतनीकरण करताना माथेरान हेरिटेज कमिटी आणि माथेरान सनियांत्रण समितीची परवानगी घेण्यात आली होती. त्यामुळं या दुरुस्ती आणि नूतनीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागकडून 60 लाखाचा निधी मंजूर झाला होता.

माथेरान पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी संजय बांगर यांनी हा निधी खर्च व्हावा आणि पोलीस ठाण्याची इमारत सुसज्ज व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.त्या निधी मधून सार्वजानिक बांधकाम विभागाने पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरुस्ती करून घेतली आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नूतनीकरण करून घेतले.नुतनीकरण झालेल्या इमारतीचे लोकार्पण कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रशासक सुरेखा भणगे, महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे ,सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, चंद्रकांत चौधरी हे उपस्थित होते.

Exit mobile version