खालापुरातील विश्रामगृहाला दुरुस्तीचे ग्रहण

रसायनी | वार्ताहर |
काही महिन्यांपूर्वी विश्रामगृहावर थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर दुरूस्तीची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी होत आहे. तीनच वर्षांपूर्वीच लाखो रूपये खर्चून डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात आली होती.

विश्रामगृहाच्या मागील बाजूस कर्मचारी निवासाची प्रचंड दुरवस्था झाली असून, साप व विंचूचा वावर वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीला प्राधान्य देण्याऐवजी नुकत्याच झालेल्या कामाची पुन्हा तोडफोड करणे कितपत योग्य आहे. कोरोना काळात महत्त्वाची कामे ठप्प असताना, विश्रामगृहासाठी मात्र निधी उपलब्ध झाला आहे.एक व्हीआयपी सूट असताना, दुसर्‍या सूटसाठी तोडफोडीला सुरवात झाली आहे. लाखो रुपयांची उधळपट्टी चा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे. विश्रामगृहाची दुरुस्ती तातडीची आवश्यक होती का? असा प्रश्‍नदेखील पडला आहे.

खालापूर तालुका कोरोना संसर्गात आरोग्य सेवेच्या बाबतीत पिछाडीवर आहे. प्राथमिक केंद्रातील गैरसोय दूर करून त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधांसाठी खर्च होणे अपेक्षित असताना विश्रामगृहावर होणारा खर्च न करण्यासारखा आहे. माहिती अधिकारात सर्व माहिती मागवणार आहे.
प्रशांत पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता

Exit mobile version