गुडवण पुलाची तरुणांकडून दुरुस्ती

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर असलेला गुडवण गावाजवळील पुल अनेक वर्षे नादुरुस्त झाला आहे. या पुलावरील डांबर वाहून गेल्याने खड्डेमय रस्त्याने अनेक वर्षे वाहतूक सुरू आहे. त्याबाबत स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने गुडवण गावातील स्थानिक तरुणांनी पुलाची दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने केली आहे.

बोरिवली ग्रामपंचायतमधील गुडवण गावाला जोडणारा पुल चिल्लार नदीवर उभा आहे. तब्बल 35 वर्षापूर्वी बांधलेल्या या पुलाची एकदाही सार्वजनिक बांधकाम विभगणे दुरुस्ती केलेली नाही. एकेरी वाहतूक करता येईल, असा तो पुल असून तालुक्यातील जमिनीपासून सर्वाधिक उंच असलेला हा पुल स्थानिकांना नदी पार करण्यासाठी उपयोगात आहे. गावातील ग्रामस्थांनी पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी अनेक वर्षे केली आहे. मात्र बांधकाम विभागला पुलाची दुरुस्ती करायला वेळ नाही. पुलाचा पृष्ठभाग खराब झाला असून अनेक ठिकाणी स्लॅबसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे वाहनांना वाहतूक करताना कसरत करावी लागते. त्याचवेळी पुलावरून मोठ्या गाड्यांची वाहतूक होत नसल्याने स्थानिक तरुणांनी आर्थिक भार स्वतः सोसण्याचा निर्णय घेतला आणि दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. रामदास खडे, रोहिदास खडे आणि संकेत खडे या तिघांनी मजूर कामाला घेतले आणि पृष्ठभाग सिमेंट प्लास्टर टाकून बुजविला. या कामामुळे पुलावरून गणेशोत्सव काळात सर्वांना वाहतूक करता येणार आहे.

Exit mobile version