| माथेरान | वार्ताहर |
नेरळ-माथेरान घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून या घाटरस्त्यासाठी जवळपास सहा कोटी रुपये मंजूर केले, असून नेरळपासून जुम्मापट्टी भागापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. तर पुढील साडेतीन किलोमीटर दस्तुरी नाक्यापर्यंतच्या घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या नेरळपासून जुम्मापट्टी भागापर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे पर्यटकांना तसेच वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचा प्रवास सुरळीतपणे होणार आहे.
घाटरस्त्यात पावसाळ्यात दरडी पडण्याची शक्यता असते. याकामी दरड प्रतिबंधक जाळ्या लावण्यात येत असून काही महिन्यांपूर्वी दस्तुरी पासूनच्या घाटरस्त्यात या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. यामुळे पावसाळ्यातसुध्दा वाहनचालकांना बिनधास्तपणे प्रवास करणे सुलभ झाले आहे. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील आणि कर्जत तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने सरकारने या स्थळाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.केवळ पर्यटन शेतीवर इथल्या स्थानिकांना आपला उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे पर्यटन बहरले तरच सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो.हा दूरदृष्टीकोन ठेऊन माथेरान हे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.
सध्या नेरळपासून जुम्मापट्टी या साडेतीन किलोमीटरच्या भागात उत्तम प्रकारे डांबरीकरण काम सुरू असून पुढील रस्त्याचे काम सुध्दा लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे.ज्या ज्या ठिकाणी धोकादायक दरडी आहेत.त्याठिकाणी संरक्षण जाळ्या बसविण्यात येत आहेत.
संजय वानखेडे
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग