ग्रामस्थ, तरुण मंडळाचा पुढाकार; शेकडो लिटर पाणी वाचले
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाद्वारे महाजने गावाला पाणी पुरवठा होतो. परंतू गेल्या पंधरा दिवसांपासून पाईपलाईनला गळती लागली होती. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने शेकडो लिटर पाणी वाया जाऊ लागले. गावामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर महाजने ग्रामस्थ, तरुण मंडळांनी एकत्र येऊन श्रमदानातून पाईपची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
उमटे येथील धरणातून 12 ग्रामपंचायत हद्दीतील 42 नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी कपात सुरु केले आहे. एक दिवस आड करून गावांना पाणी पुरवठा होत आहे. बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या महाजने गावाला उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या गावाची लोकसंख्या 1000 पेक्षा अधिक आहे. येथील नागरिक उमटे धरणाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. परंतू गेल्या पंधरा दिवसापासून गावातील पाईपलाईनला गलती लागली होती. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ लागले होते. पाईपलाईन गळतीमुळे गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर महाजने ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी एकत्र येत श्रमदानातून खड्डा खोदला. गळती लागलेल्या पाईपची दुरुस्ती करून वाहून जाणारे पाणी बंद केले. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ग्रामस्थ पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम करीत होते. पाईपलाईन दुरुस्त झाल्यावर पाणी सुरळीत सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.
गेल्यावर्षीदेखील पाईपलाईन गळती लागली होती. ग्रामस्थांनी त्यावेळीदेखील पुढाकार घेत रात्रीचा दिवस करून नवीन पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.