| अलिबाग | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवापूर्वी या महामार्गावरील खड्डे तातडीने भरावेत, तसेच वडखळ बायपास व खारपाडा सर्व्हिस रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांंच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल घेत चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन दिले.
यंदा गणेशोत्सवाचे आगमन 19 सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. त्यानिमित्ताने चाकरमान्यांची तयारी आता सुुरू झाली आहे. मात्र, सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या 12 वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण करण्यास सरकार उदासीन ठरले आहे. बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.5) रायगड जिल्ह्यात दौरा केला आहे. या दौऱ्याच्या दरम्यान पंडित पाटील यांनी पनवेल येथे रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, मोहन भोपी आदी उपस्थित होते.
चव्हाण यांच्याशी चर्चा करताना पंडित पाटील यांनी खराब असलेल्या महामार्गाचा पाढाच वाचला. प्रचंड खड्डे पडले आहेत. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात पर्यटनावरही परिणाम होत आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. फक्त सरकारकडून आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यंदाही गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणासह रायगड जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम तातडीने करावे. कोकणवासियांसह रायगडकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.|
वडखळ बायपास रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच खारपाडा येथील सर्व्हिस रस्त्याचीदेखील अवस्था दयनीय आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर तातडीने काँक्रिटीकरण करून प्रवाशांचा प्रवास चांगला करावा, असे त्यांनी सांगितले. पाटील यांच्या मागणीबाबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती तातडीने केली जाईल. तसेच वडखळ बायपास व खारपाडा येथील रस्त्यांच्या कामाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.