उड्डाणपुलाची तातडीने दुरुस्ती करा – प्रीतम म्हात्रे

। पनवेल । प्रतिनिधी ।
ठाणा नाका येथून खांदा कॉलनी येथे जाताना रेल्वेचा उड्डाणपूल आहे. त्या पुलावर ठाणा नाका ते खांदा कॉलनी येथे जाताना नऊ आणि खांदा कॉलनी येथून ठाणा नाका येथे येताना नऊ असे एकूण 18 एक्सपान्शन जॉइंट आहेत. त्यातील काही जॉइंटमधील रबर आणि काँक्रिट निघाल्यामुळे तेथे खड्डे पडले आहेत. तेथून रहदारी करणार्‍या वाहनचालकांना त्यात मुख्यत्वेकरून दुचाकी आणि रिक्षाचालकांना त्रास होत आहे. पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी यासंदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना याठिकाणी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत.
याठिकाणी नुकतेच सदर खड्डा लक्षात न आल्यामुळे अचानक ब्रेक दाबून रिक्षा थांबल्याने तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित एमएसआरडीसी विभागातील अधिकारी सोनवणे यांच्याशी संपर्क साधून त्या विभागात रस्ता मेंटेनेसचे काम करणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलवून सदर विषयाची माहिती घेऊन त्यांना नागरिकांची समस्या दाखवली. यावेळी सदरचे काम मेंटेनेसमध्ये येत नसल्यामुळे आम्ही केले नाही, यासाठी वेगळे कामाचे अ‍ॅप्रूवल घेऊन आम्ही काम पूर्ण करू, असे उपस्थित असणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले. यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना रस्ता सुरळीत प्रवासासाठी मोकळा करुन द्यावा, असे निर्देश प्रीतम म्हात्रे यांनी दिले. यासाठी त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते करण्यात येईल असेही म्हात्रे म्हणाले.

Exit mobile version