काशिद पुलाची तातडीने दुरुस्ती करा

काशिद दुर्घटनास्थळी पालकमंत्र्यांची पाहणी
| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग-मुरूड राजमार्गावरील काशिद येथील छोटा साकव पूल अतिवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनाग्रस्त भागाची राज्याच्या मंत्री व जिल्हाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाची तातडीने दुरुस्ती करुन, वाहतूक सुरळीत करावी, अशा सूचना प्रशासनास दिल्या.

काशिद येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत अलिबाग सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राहुल मोरे, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, तसेच बांधकाम विभागाचे इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. त्याप्रमाणे या दुर्घटनेत दुर्दैवाने घटनास्थळी वाहून गेलेल मुरूड तालुक्यातील एकदरा येथील रमेश चव्हाण यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठीची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने तत्परतेने करावी, अशी सूचनाही स्थानिक प्रशासनास दिली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या जखमींची आस्थेने विचारपूस केली, तसेच काशिद गावातील ग्रामस्थासह संवाद साधून शासन जनतेच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. काशिद पूल लवकरात लवकर तयार करून या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे आणि त्यांच्या सहकार्‍यांना दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहूल मोरे यांना काशिद पुलाचे दुरूस्तीचे काम त्वरित करून हा रस्ता वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्यात यावा, अशा सूचना केल्या.

Exit mobile version