‘नेरळ-माथेरान घाटरस्त्याची दुरुस्ती करा’

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ-माथेरान घाटातील रस्त्यावर मिनी ट्रेनचे क्रॉसिंगवर मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. मात्र, पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजवून रस्ता खराब असलेल्या भागात डांबरी पट्टे मारावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत तर भाजप आंदोलन करेल, असा इशारा बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे दिला आहे.

माथेरान नेरळ घाट रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंग आणि अनेक ठिकाणच्या खड्ड्यांमुळे उपचाराकरिता खाली नेण्यात रुग्णांना, नागरिक व पर्यटकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घाटात होत असलेले अपघात यामुळे वाहन चालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करीत असतात. सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता यांची कर्जत येथे भेट घेऊन घाटरस्त्यावरील व रेल्वे क्रॉसिंगजवळील खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी करणारे निवेदन दिले होते. भाजप माथेरान शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ आणि माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या नेतृत्वात सादर केल्यानंतर सदरच्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु रस्त्यावरील खड्डे भरून झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. घाटरस्त्यावरील व रेल्वे क्रॉसिंग जवळील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत केला नाही तर मात्र भाजप समस्त ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.

Exit mobile version