रस्ता दुरुस्त करा, अन्यथा सेवा बंद

आगार व्यवस्थापकांचा ग्रामपंचायतींना अजब फतवा
। पेण । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडची ग्रामपंचायतींनी दोन दिवसांत तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा फतवा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना बजाविण्यात आला आहे. पेण एसटी आगार व्यवस्थापकांच्या अजब फतव्याने पेण ते वडखळदरम्यान असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जोर का झटका लागला आहे.

‘चोर सोडून संन्याशाच्या’ मागे या म्हणीप्रमाणे सध्या एसटी महामंडळाचे सुरु आहे. पेण एसटी आगार व्यवस्थापकाने अजब फतवा काढून एक प्रकारचा धमकीवजा संदेशच ग्रामपंचायतींना दिला आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असणारे सर्व्हिस रोड हे ग्रामपंचायत करत नसून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे रस्ते करत असतात, याची माहिती एसटी व्यवस्थापकांना नसणे म्हणजेच हे किती दुर्दैवाचे आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली 12 वर्षे सुरु असून, या कामाचे नियोजन योग्य प्रकारे न केल्यामुळे अनेक गावांना पहिल्याच पावसात पुराचा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गावांना नॅशनल हायवेकडून सर्व्हिस रोड बांधून देण्यात आले. परंतु, या सुमार दर्जाच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सहा इंच ते दीड फुटांपर्यंत खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.

या सर्व्हिस रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटीची स्प्रिंग तुटणे व टायर पंचर होणे, या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पेण एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी कांदळे, उंबर्डे, मळेघर या ग्रामपंचायतींना लेखी पत्र पाठवून दोन दिवसात रस्ते दुरुस्त करून घ्या अन्यथा एसटीची सेवा बंद करण्यात येईल, असा आदेश दिला आहे. या गाड्या पेण ते वडखळ सर्व्हिस रोडवरून न जाता त्या मुंबई-गोवा हायवेच्या पुलावरून नेण्यात येतील, असा धमकीवजा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

हे रस्ते हे नॅशनल हायवे अंतर्गत येतात, त्यांना हे पत्र देण्याऐवजी ग्रामपंचायतींना अशा प्रकारचे आदेश देऊन एसटी प्रशासनाने आमची क्रूर चेष्टा केली आहे. कांदळे ग्रामपंचायत हद्दीतून सुमारे 150 ते 200 विद्यार्थी दररोज शिक्षणाकरिता, तसेच ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व ग्रामस्थ एसटीने प्रवास करतात. एसटी सेवा बंद झाल्यास गोरगरीब ग्रामस्थांना मोठा आर्थिक फटका बसेल.

– मुरलीधर भोईर, सरपंच कांदळे ग्रामपंचायत

ग्रामपंचायतींना नक्की कशा प्रकारचे पत्र दिलेले आहे, याबाबत मला माहिती नाही. परंतु, रस्ते होणे गरजेचे आहे. व्यवस्थित रस्ते नसल्याने मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान होत आहे. उद्या अपघात झाल्यास जबाबदारी कोणी घ्यायची?

– अनघा बारटक्के, जिल्हा विभागीय अधिकारी, एसटी महामंडळ
Exit mobile version