| म्हसळा | प्रतिनिधी |
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कोकणात गणरायाच्या स्वागतासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि भाविक आपल्या गावाकडे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस तसेच लोकप्रतिनिधींनी समन्वयाने तातडीने रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक नियोजनाची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख राज्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे, अरुंद रस्ते, अपूर्ण कामे तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.विशेषतः इंदापूर-माणगाव परिसरातील वाहतूक, पर्यायी मार्गांची उपलब्धता, राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेली कामे आणि महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक व्यवस्थापन याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्ण करून चाकरमानी व भाविकांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.







